संसदेतील संघर्ष टोकाला; लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांविरोधात अविश्वास प्रस्तावाची तयारी...

Foto
नवी दिल्ली:संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वेगवेगळ्या कारणांमुळे वादळी ठरत आहे. आम्हाला बोलू दिले जात नाही, असा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत. याच पार्श्वभूमीवर, विरोधकांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक झाल्याचेही समोर आले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल गांधी लोकसभेत खासदारांच्या निलंबनाचा मुद्दा, तसेच महिला खासदारांवर झालेल्या आरोपांबाबत बोलू इच्छित होते. त्यांनी सभागृहात बोलण्याची परवानगी मागितली होती. मात्र, विरोधकांच्या गदारोळामुळे सोमवारी (९ फेब्रुवारी २०२६) सकाळी लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावाची तयारी

विरोधकांचा आरोप आहे की, संसदेत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ दिली जात नाही आणि विरोधी पक्षांचा आवाज दाबला जातो. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यपद्धतीविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत विरोधक आहेत.

हिमंत बिस्व सरमा यांच्याविरोधात कारवाईची मागणी

दरम्यान, विरोधी खासदारांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्याविरोधातही कारवाईची मागणी केली आहे. काँग्रेस खासदार इमरान प्रतापगढी यांनी या संदर्भात तीव्र प्रतिक्रिया देत सांगितले की, एक मुख्यमंत्री असताना हिमंत बिस्व सरमा अशा प्रकारचे व्हिडीओ तयार करतात. ते व्हिडीओ आसाम भाजपाकडून सोशल मीडियावर पोस्ट केले जातात आणि नंतर ते हटवले जातात. याप्रकरणी पंतप्रधान, गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी.

संसदेत राजकीय तणाव कायम

या सर्व घडामोडींमुळे संसदेत राजकीय तणाव वाढलेला असून, येत्या काळात विरोधकांची भूमिका अधिक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभेतील कामकाज सुरळीत होणार की, संघर्ष अधिक तीव्र होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.